Crop: कांदा | Topic: B.कांदा लागवडीनंतरचे नियोजन

कांदा पिकात फवारणी करताना घ्यायची काळजी. 

कांदा पिकामध्ये फवारणी करताना खालील काळजी घेणे गरजेचे आहे

✅फवारणी करण्यापूर्वी शेतास पाणी द्यावे. ज्यावेळेस पाणी दिले जाते त्यावेळेस जमिनीमध्ये ओलावा निर्माण होतो.त्या ओलाव्यामुळे रोपांची कार्यक्षमता वाढते, रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया जसे कि प्रकाशसंश्लेषण,अन्नद्रव्ये वाहतूक,श्वसन प्रक्रिया या सुरळीत चालतात व यामुळे जे द्रावण फवारणीद्वारे दिले जाते ते पर्णरंध्राद्वारे चांगल्या प्रकारे आतमध्ये शोषले जाते व त्याचे चांगले परिणाम कमी कालावधीत दिसून येतात. 

✅फवारणी ही सकाळी धुके कमी झाल्यानंतर म्हणजेच ऊन पडल्यानंतर करावी. ज्यामुळे धुक्यामुळे जो बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार आहे तो होणार नाही. धुके पडल्यामुळे पाती ओल्या राहतात, ज्यामुळे त्या ओलाव्याद्वारे बोटट्रीस करपा ,डाऊनी,स्टेमफायलियम करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो.त्यावर धुके कमी झाल्यानंतर फवारणी केल्यामुळे फवारणीचे परिणाम चांगले दिसतात.  

✅कांदा पिकामध्ये फवारणी करत असताना फवारणी ही सायंकाळी उशिरा सूर्यप्रकाश नसताना करू नये. फवारणी ही दिवसभरात सूर्यप्रकाश असताना करावी, कारण फवारणीमध्ये वापरली जाणारी आंतरप्रवाही उत्पादने ही पर्णरंध्राद्वारे आतमध्ये शोषली जातात व वनस्पतीची पर्णरंध्रे ही सूर्यप्रकाश असताना कार्य करतात. त्यामुळे आंतरप्रवाही उत्पादनांचे परिणाम दिसण्यासाठी सूर्यप्रकाश असताना फवारणी करावी. सूर्यप्रकाश नसताना फवारणी केल्यास फवारणीचे पैसे वाया जातील. 

✅कांदा पिकामध्ये फवारणी करत असताना फवारणी मध्ये सिलिकॉन बेस स्टिकरचा वापर हा करावाच.कांदा  पिकाची पातीवर स्टिकरचा वापर न करता फवारणी केली, तर फवारणीचे द्रावण पातींच्या नैसर्गिक रचनेमुळे (कांदा पात ही  इतर वनस्पतींच्या पानांच्या तुलनेत जास्त गुळगुळीत असते) त्यावर फवारणीचे द्रावण टिकून राहते व द्रावणाचे परिणाम दिसून येत नाहीत. त्याउलट जर फवारणी द्रावणात स्टिकरचा वापर केला तर, फवारणी द्रावण पातीवर चांगल्या प्रकारे चिटकते व फवारणीचे परिणाम चांगल्या प्रकारे दिसून येतात. 

✅कांदा पिकात कांदा रोप लागवडीनंतरच्या  पहिल्या  दोन फवारण्या करत असताना त्या फवारण्या करताना फवारणी नोझलमध्ये जो रबर असतो तो काढून दाट फवारणी करावी, पहिल्या दोन फवारण्या या रोप रूजण्याच्या अवस्थेत असतात. या अवस्थेत रोपांना दोन ते तीन पाती असतात. त्यामुळे फवारणी द्रावण पातींद्वारे हव्या त्या प्रमाणात शोषले जात नाही,त्त्यामुळे जर नोझल काढून दाट फवारणी केली तर, द्रावण हे रोपांबरोबरच ओल्या जमिनीवर सुद्धा पडेल व जमीन ओली असल्यामुळे ते जमिनीमध्ये रोपांच्या मुळांद्वारे आतमध्ये शोषले जाईल व त्याचे परिणाम चांगल्या प्रकारे दिसून येतील व रोपे सेट होतील आणि सुरुवातीच्या टप्प्यात होणारी रोप मर, रोप पिवळे पडणे, रोपांना पिळ पडणे यांसारख्या अडचणी येणार नाहीत.तसेच जरी अडचणी येत असतील तर अशी फवारणी केल्यास त्यावर नियंत्रण मिळेल. 

✅कांदा पिकात येणाऱ्या लाल कोळीच्या नियंत्रणासाठी केली जाणारी फवारणी ही भर दुपारी उन्हाची करावी जेणेकरून त्याचे परिणाम चांगले दिसतील व लाल कोळी या किडीवर नियंत्रण मिळेल.