कांदा रोपांची लागवड करण्यापूर्वी लागवड करताना किंवा लागवड केल्यानंतर कोणती काळजी घ्यावी?
कांदा रोपांची लागवड करण्यापूर्वी लागवड करताना किंवा लागवड केल्यानंतर कोणती काळजी घ्यावी?
सुरुवातीच्या टप्प्यात रोपे पुर्नलागवडीनंतर सेट होण्यासाठी, रोपे लागवडीपूर्वी, रोपे लागवड करताना किंवा रोपे लागवड केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
रोपे लागवड करण्यापूर्वी घ्यायची काळजी
✅रोपे लागवड करण्यापूर्वी म्हणजेच रोपे नर्सरी मधून आणल्यानंतर रोपांची काळजी घेणे गरजेचे आहे. रोपे ही सावलीमध्ये व बारदानाच्या पोत्यात ठेवावीत,उन्हामध्ये ठेवू नयेत. उन्हामध्ये ठेवल्यास रोपे सुकतात व अशी रोपे लवकर सेट होत नाहीत. परंतु रोपे जर टवटवीत व ताजी असतील तर, अशी रोपे रोप लागवडीनंतर लवकर सेट होतात, त्याचबरोबर रोपे ताजी असतील तर प्रक्रियेनंतर द्रावणाची कार्यक्षमता वाढते.
✅रोपे लागवडीपूर्वी रोपांवर प्रक्रिया करावी. रोपांवर प्रक्रिया केल्यानंतर रोपांवर जर नर्सरीमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्यावर नियंत्रण मिळून मुख्य क्षेत्रांमध्ये पुर्नलागवडीनंतर प्रादुर्भाव होत नाही. तसेच किडींवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्याचबरोबर हि प्रक्रिया केल्यामुळे पांढऱ्या मुळांची जोमदार वाढ होते व पुर्नलागवडीनंतर रोपे लवकर सेट होतात.
✅रोप लागवडीपूर्वी शेतात योग्य प्रकारे रासायनिक व सेंद्रिय खतांचा बेसळ डोस द्यावा, शक्यतो मशागत करताना द्यावा जेणेकरून रोपे अन्नद्रव्य शोषण करतात व अन्नद्रव्य कमतरता भासत नाही.
✅रोप लागवडीपूर्वी शेताला पाणी द्या व शेत वापस्यावर आल्यावर रोपांची लागवड करा, जेणेकरून रोपांना योग्य प्रमाणात ओलावा मिळेल आणि रोपे लवकर सेट होतील व रोपांची मर होणार नाही, परंतु काही परिस्थितीमध्ये कोरड्या शेतात कांदा रोपांची लागवड केली तरी चालेल.
रोप लागवड करताना घ्यायची काळजी
✅रोपे लावताना महत्त्वाची काळजी म्हणजे रोपांची योग्य अंतरावर लागवड करणे. जर रोपांची लागवड योग्य अंतरावर केली तर शेतामध्ये एकरी 250000 ते 300000 रोपे बसतात. ज्यातून तुम्ही 25 ते 30 टन उत्पादन घेऊ शकता. त्यासाठी दोन रोपांमध्ये आडवे सरासरी अंतर हे 10 cm असावे व दोन ओळींमधील अंतर हे 10 cm असावे.
✅रोप लागवड करताना व्यवस्थित रेषा ओढाव्यात. रेषा किमान 3 ते 5 cm खोल असाव्यात, ज्यामध्ये रोपे व्यवस्थित लावून त्यांना माती लावावी. जेणेकरून रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होईल व रोपे लवकर सेट होतील.
✅रोपे लावताना कमकुवत व कमी वाढ झालेल्या रोपांची लागवड करू नये जेणेकरून पुढे जाऊन अशा रोपांची मर होणार नाही.
रोपे लागवड केल्यानंतर घ्यायची काळजी
✅रोपे लागवड केल्यानंतर प्रमुख गोष्ट आहे ती म्हणजे रोपांना पाणी देणे गरजेचे आहे. जर तुषार सिंचन किंवा रेन पाईप द्वारे पाणी देत असाल तर मातीच्या प्रकारानुसार पाणी द्या. जर शेत हलके असेल म्हणजेच मुरमाड किंवा वाळूसार असेल तर रोग पुर्नलागवडीनंतर 3 ते 4 तास पाणी द्यावे.
✅जर माती मध्यम हलकी म्हणजेच तांबट काही मिक्स किंवा तांबट असेल तर 2 ते 3 तास पाणी द्यावे. जर माती एकदम जाड म्हणजेच काळी किंवा गाळाची असेल तर रोपे पुर्नलागवडीनंतर 1 ते 2 तास पाणी द्यावे. पाणी देताना मातीचा प्रकार, गुणवत्ता याच्यानुसार पाणी द्यावे. परंतु पहिल्या वेळेस शेत संपूर्णपणे ओले होईल असे पाणी द्यावे.
✅जर पाणी हे पाटपाणी पद्धतीतद्वारे देत असाल तर पाणी हे कमी वेगाने द्यावे, जेणेकरून रोपे वाहून जाणार नाहीत. जर पाणी हे जास्त वेगाने दिले तर रोपे वाहून जातील. त्यामुळे पाट पाणी देताना ही काळजी घ्यावी.
✅कांदा रोपांची लागवड केल्यानंतर पहिले पाणी दिल्यानंतर रान वापस्यावर आल्यावर पहिली फवारणी करावी.जेणेकरून रोपांची मर होणे ही अडचण येणार नाही व रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय वाढ होऊन रोपे लवकर सेट होतील.
अशाप्रकारे कांदा रोपांची लागवड करण्यापूर्वी, लागवड करताना व लागवड केल्यानंतर काळजी घ्यावी.