कांदा रोप लागवडीनंतर पाणी नियोजन कसे करावे?
कांदा पिकाच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने पाणी नियोजन योग्य प्रकारे करणे खूप गरजेचे आहे. कांदा रोपांची लागवड केल्यानंतर पाणी नियोजन हे जमिनीचा प्रकार,जमिनीची गुणवत्ता,जलसिंचन प्रकार,लागवडीचा प्रकार यानुसार करावे.
तुषार सिंचन पद्धती
या पद्धतीद्वारे पाणी नियोजन करण्यासाठी मातीचा प्रकार व गुणवत्ता लक्षात घेणे गरजेचे आहे.जर माती हलकी म्हणजेच मुरमाड किंवा वाळूसार असेल, तर अशा मातीमध्ये तुषार सिंचन पद्धतीद्वारे पाणी देत असताना 1 दिवसाआड 1 तास पाणी द्यावे. तसेच जर माती मध्यम हलकी म्हणजेच काळी-तांबट माती किंवा तांबट माती असेल तर 3 ते 4 दिवसांनी 1 ते 1.30 तास पाणी द्यावे. जर माती जाड असेल म्हणजेच काळी किंवा गाळाची माती असेल तर आठवड्यातून म्हणजेच 7 ते 8 दिवसातून एकदा पाणी द्यावे. अशा प्रकारे तुषार सिंचन पद्धतीद्वारे पाणी देत असताना शेत लवकरात-लवकर वाफसा स्थितीत यावे अशा प्रकारे पाणी नियोजन करावे.
पाट पाणी पद्धत
या पद्धतीद्वारे पाणी नियोजन करण्यासाठी मातीचा प्रकार, मातीची गुणवत्ता, वातावरण लक्षात घेणे गरजेचे आहे.जर माती हलकी म्हणजेच मुरमाड किंवा वाळूसार असेल तर अशा मातीमध्ये पाट पाणी पद्धतीद्वारे पाणी देत असताना 4 ते 5 दिवसातून एकदा पाणी द्यावे.तसेच जर माती मध्यम-हलकी असेल तर 8 ते 10 दिवसातून एकदा पाणी द्यावे, जर माती जाड असेल तर म्हणजेच काळी किंवा गाळाची असेल तर 12 ते 15 दिवसातून पाणी द्यावे. पाणी देताना वातावरण कसे आहे पावसाची शक्यता,ढगाळ वातावरण याची माहिती घेऊन करणे गरजेचे आहे.
ठिबक सिंचन पद्धत
या पद्धतीद्वारे पाणी नियोजन करण्यासाठी मातीचा प्रकार, मातीची गुणवत्ता, वातावरण लक्षात घेणे गरजेचे आहे.जर माती हलकी म्हणजेच मुरमाड किंवा वाळूसार असेल तर अशा मातीमध्ये ठिबक सिंचन पद्धतीद्वारे पाणी देत असताना 1 ते 2 दिवसातून 30 मिनिटे पाणी द्यावे.तसेच जर माती मध्यम-हलकी असेल तर 2 ते 3 दिवसातून 30 मिनिटे पाणी द्यावे, जर माती जाड असेल तर म्हणजेच काळी किंवा गाळाची असेल तर 5ते 7 दिवसातून पाणी द्यावे. पाणी देताना वातावरण कसे आहे पावसाची शक्यता,ढगाळ वातावरण याची माहिती घेऊन करणे गरजेचे आहे.